pula

पु. लं.

पु. लं. तथा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्रभूषण, मराठीतील सर्वोत्कृष्ट विनोदी लेखक, सिद्धहस्त अभिनेते, गायक, संगीतकार आणि पटकथालेखक.

पु. लं. च्या लेखनाने गेली ६० वर्षे मराठी रसिकांच्या कित्येक पिढ्यांना खळखळून हसवले आहे. रोजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण जीवनातून चार निर्भेळ आनंदाचे क्षण सामान्य जनांना मिळवून देण्यात पु. लं. च्या लेखनाचा फार मोठा वाटा आहे. कुणालाही न दुखवता, मिश्कील वृत्तीने आपल्या नेहमीच्या जगण्यातील आणि वागण्यातील विसंगती टिपणे ही त्यांची खासियत. पु. लं नी वेगवेगळ्या स्वरुपाचे लेखन केले. अपूर्वाई आणि जावे त्यांच्या देशा मधून पाश्चात्य जगाची तर पूर्वरंग मधून सुदूरपूर्वेची सफर वाचकांना घडवून आणली. सहा महिने शांतिनिकेतनात राहून स्वत: बंगाली शिकून पु. लं. नी वंगचित्रे नावाचे पुस्तक त्या अनुभवांवर लिहिले आणि त्यामार्फत रवींद्रनाथ टागोरांच्या कार्याची आणि समृद्ध बंगाली संस्कृतीची ओळख घडवून दिली.

आपल्या सभोवती रोज आढळणाऱ्या व्यक्तिविशेषांचे अचूक वर्णन हे तर पु. लं. चे सर्वात मोठे वैशिष्ट्य. 'व्यक्ती आणि वल्ली' मधल्या सखाराम गटणे, नारायण, हरितात्या, नंदा प्रधान, चितळे मास्तर, अंतू बरवा, पेस्तनकाका या अजरामर वल्ली असोत किंवा बटाट्याच्या चाळीतील चाळकरी; असा मी असामीतील धोंडोपंत जोशी असोत किंवा मग पाळीव प्राणी अथवा माझा शत्रुपक्ष मध्ये रेखाटलेले उच्छाद देणारे लोक. कुठेही कुणाची कुचेष्टा न करता हसत-खेळत त्यांच्या व्यंगावर अचूक बोट कसे ठेवावे हे पु. लं. कडूनच शिकावे. 'तुम्हाला कोण व्हायचे आहे : मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' हा सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेला लेख आजही आपल्याला तेवढाच पटतो. 'दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट म्हणजे गिऱ्हाईक' या वाक्याचा पडताळा आजही बऱ्याच पुणेरी दुकानांतून आपल्याला येत असतो. अजूनही एखादा नाथा कामत, एखादे चितळे मास्तर किंवा 'तुझे आहे तुजपाशी' मधले काकाजी आपल्याला कुठे ना कुठे भेटतात आणि पु. लं. च्या समर्थ लेखणीचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो.

आपल्याला एखाद्या साहित्यकृतीतून किंवा संगीतातून मिळणारा आनंद इतर चार लोकांना वाटून टाकावा आणि त्यांनाही या आनंदयात्रेत सामावून घ्यावे, ही पु. लं. च्या लेखनामागची मूळ प्रेरणा. त्यातूनच मग त्यांनी थ्री पेनी ऑपेरा, पिग्मॅलियन, ओल्ड मॅन अँड द सी, इडिपस रेक्स अशा अनेक अभिजात पाश्चात्य साहित्यकृती मराठीत आणल्या. बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात आणि असा मी असामी चे अनेक प्रयोग मराठी रंगभूमीवर केले. गजाननराव वाटव्यांची जुनी भावगीते रसिकांपर्यंत पुन्हा पोहोचवली. बा. सी. मर्ढेकरांच्या कविता सामान्यजनांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून सुनीताबाईंसोबत त्यांच्या जाहीर काव्यवाचनाचे खेडोपाडी प्रयोग केले. 'वंदे मातरम','पुढचे पाऊल', 'दूधभात' आणि 'गुळाचा गणपती' या आणि अशा अनेक मराठी चित्रपटांत पटकथा आणि संवादलेखक, गायक, संगीतकार आणि अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे पार पाडल्या.

लेखक म्हणून आपल्यावर असणाऱ्या सामाजिक जबाबदारीचेही तीव्र भान पु. लं. ना होते. त्यामुळेच सरकारच्या रोषाची पर्वा न करता १९७७ च्या आणीबाणीविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांत दुर्गाबाई भागवतांप्रमाणेच ते आघाडीवर होते. 'जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे, उदास विचारे, वेंच करी' हा तुकारामांचा अभंग शिरसावंद्य मानून त्यांनी समाजपयोगी कार्याकरिता पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानाची स्थापना केली. बाबा आमटे यांचे आनंदवन, अनिल अवचट यांचे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, संगमनेर येथील ग्रामीण विद्यापीठ अशा कित्येक संस्थांना यातून त्यांनी भरघोस मदत केली.

एकंदरीतच समस्त मराठी भाषक समाजावर पु. लं. चे ऋण मोठे आहे. केवळ विनोदी लिहून आपल्या चार घटका सुखात घालवल्या इतपत त्यांचे योगदान मर्यादित नाही. आपली एकंदरीच सांस्कृतिक जाणीव समृद्ध करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. जीवनात जशी कुरुपता आहे, तसेच सौंदर्यही आहे. त्या सौंदर्याचा माग घेण्याचा डोळस प्रयत्न केला तर सारे जगणे ही एक आनंदयात्रा बनून जाते, हे त्यांचा लेखनातून आणि इतर कलाविष्कारांतून सातत्याने जाणवत राहते.

साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत लीलया विहार करणाऱ्या या प्रतिभावंताचा जन्म मुंबईत ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. त्यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळातर्फे पु. लं. ना त्यांच्याच लेखनातील काही अविस्मरणीय भाग सादर करून एक कलात्मक आदरांजली वाहण्याचा आम्ही एक प्रयत्न करत आहोत. त्यातील पहिला भाग आहे, 'ती फुलराणी' मधील सुप्रसिद्ध स्वगत.